पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध पदभरती परीक्षांसाठी उमेदवारांनी केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. उमेदवारांनी केलेल्या दाव्यांबाबत मुलाखतीवेळी केली जाणारी कागदपत्रांची पडताळणी आता मुलाखतीपूर्वीच केली जाणार असून, उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

एमपीएससीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. विविध दाव्यांच्या अनुषंगाने संबंधित जाहिरातीस अनुसरून ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवाराची पात्रता आजमावल्यानंतर जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास आता पुराव्यादाखल उमेदवारांना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत एकूण २० प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

एमपीएससीच्या पदभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून भूकंपग्रस्त, खेळाडू, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचे दावे केले जातात. हे दावे सिद्ध करण्यासाठी आता अर्जाबरोबरच कागदोपत्री पुरावे द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय नाव, वय, शैक्षणिक अर्हता, राज्यातील अधिवास, अनुभव, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी भाषेचे प्रमाणपत्र अशा कागदपत्रांचाही या यादीत समावेश आहे.

संबंधित कागदपत्रे उमेदवारांना जाहिरातीस अनुसरून निश्चित केलेले निकष, पात्रता, तसेच खात्यातील दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. एखाद्या उमेदवाराने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार वैध प्रमाणपत्र, पुरावा अपलोड न केल्यास संबंधित उमेदवाराला खात्याद्वारे वैध प्रमाणपत्र, पुरावा सादर करण्यास सात दिवसांची केवळ एक संधी देण्यात येईल. संबंधित उमेदवाराला लघुसंदेश, ई-मेलद्वारे, वैयक्तिकरीत्या, एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवण्यात येईल.

वैध प्रमाणपत्र, पुरावा अपलोड करण्यासाठी संधी दिलेल्या उमेदवारांनी निश्चित केलेल्या कालावधीमध्ये, निश्चित केलेल्या पद्धतीने अपलोड केलेल्या प्रमाणपत्र, पुराव्यांची पडताळणी पुन्हा प्रचलित पद्धतीने करण्यात येईल. त्या आधारे उमेदवारांच्या दाव्यांची वैधता निश्चित करण्यात येईल. या पद्धतीनुसार प्रमाणपत्र, पुराव्यांची तपासणी, पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांचे दावे अंतिम करून ते पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.