महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सी-सॅट पेपर आता पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयोगाकडून नियुक्त समितीच्या शिफारसीनुसार आयोगाने निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उमेदवारांना ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’नेही ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्णतेच्या अटीमुळे नुकसान होत असल्याचे सांगत राज्यभरातील उमेदवारांकडून सी सॅट पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत होती. त्या बाबत स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली.

हेही वाचा : पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक, अलका टॉकीज चौकात आंदोलन

या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी आयोगाकडून याबाबत समितीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या समितीच्या बैठकाच झाल्या नसल्याचे समोर आले होते. आता या समितीने अहवाल तयार करून एमपीएससीला सादर केला आहे. समितीच्या शिफारसी आयोगाने स्वीकारल्या आहेत. त्यानुसार सी सॅट आता पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निवेदन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.