पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होणार असून, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

‘एमपीएससी’तर्फे गट ‘क’ सेवेअंतर्गत उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे, कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे अशा एकूण १६१८ पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी १ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात एकूण २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. तर, २५ ऑगस्टपर्यंत बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.

मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना गट ‘क’ सेवेतील संवर्गासाठी विकल्प, तसेच लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम नमूद करून अर्ज आणि शुल्क भरावे लागेल, असे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. संबंधित संवर्ग-पदांचा सामाजिक-समांतर आरक्षणाचा तपशील शासनाकडून प्राप्त मागणीनुसार आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार या परीक्षेतून भरावयच्या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

मुख्य परीक्षेतून भरावयाच्या विविध संवर्गांसाठी उमेदवारांनी दिलेल्या विकल्पांनुसार संवर्गनिहाय स्वतंत्र निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. मुख्य लेखी परीक्षेतील गुणवत्ताक्रम, तसेच मुख्य परीक्षेच्या अर्जात दिलेला विकल्प लक्षात घेऊन लिपिक-टंकलेखक, बेलिफ-लिपिक, कर सहायक संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठीच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल.

गट ‘क’ सेवेअंतर्गत भरती

उद्योग निरीक्षक : ३९ पदे

तांत्रिक सहायक : ९ पदे

कर सहायक : ४८२ पदे

लिपिक-टंकलेखक : १७ पदे

एकूण : १६१८ पदे

थोडक्यात महत्त्वाचे…

पूर्वपरीक्षेतून पात्र उमेदवार : २६ हजार ७४०

पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा : २१ सप्टेंबर ट

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : २२ ऑगस्टपर्यंत

बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार : २५ ऑगस्टपर्यंत