Apply Online MPSC Group C Exam / पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ९३८ पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ घेतली जाणार आहे. ४ जानेवारी रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, उमेदवारांना ७ ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार आहेत.

एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ची जाहिरात प्रसिद्ध केली. या पूर्वी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गट कअंतर्गत किती पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या ४, कर सहायक पदाच्या ७३, तर लिपिक टंकलेखक पदाच्या ८५२ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना ७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी २९ ऑक्टोबर, तर परीक्षा शुल्क बँकेत भरण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, एमपीएससीने जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनाकांपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

या पदांव्यतिरिक्त परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

अशा सुधारित, अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्वपरीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहीर करण्यात येईल. पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या, तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची, विद्यमान संवर्गातील पदसंख्येत वाढ, बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक राहील.

पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील. पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे, संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची, त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याची कोणतीही तक्रार नंतरच्या टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.