पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज कामगारांनी संप पुकारल्याने गुरूवारी (दि. ९) शहरातील विविध भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनुष्यबळाअभावी दुरुस्तीला विलंब झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. संपकाळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी स्पष्ट केले आले.
आकुर्डी, शिवाजीनगर, कोथरूड, नगर रस्ता परिसर, येवलेवाडी परिसरातील वीज पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता. एनआयबीएम येथे झाड कोसळून तारा तुटल्याने वीज यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या परिसरातील वीज ग्राहकांना काही काळ खंडीत वीज पुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. घरातून काम करणाऱ्यांना वीज नसल्याने काम करता आले नाही. तसेच वृद्ध, महिला आणि अपंगांना दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण झाल्या. गृहिनींना स्वयंपाकापासून घरातील रोजची कामे करणे अवघड झाले.
महावितरणच्या पुणे विभागातील एकूण ४ हजार १४१ कर्मचाऱ्यांपैकी ६१.८२ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. पहिल्या दिवशी सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत २ हजार ५६० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. १ हजार ५०८ कर्मचारी कामावर हजर आणि ७३ कर्मचारी वैयक्तिक कारणांनी रजेवर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान, संपकाळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक भुजंग खंदारे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते ‘ऑन फिल्ड’ होते. त्यांच्याकडून शहरातील वीज यंत्रणेचा आढावा घेण्यात येत होता.
बिघाडामुळे काही ठिकाणचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. संपामुळे वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले असून, पर्यायी व्यवस्था सज्ज आहे. – सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे विभाग, महावितरण
‘तक्रारीसाठी संपर्क करा’
वीजपुरवठ्यासंदर्भात तक्रार असल्यास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.
‘रास्तापेठ कार्यालयात ठिय्या’
विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. समितीचे ईश्वर वाबळे, विश्वास भोसले, कल्याण जाधव, प्रशांत माळवदे, दिलीप कोरडे, पी. बी. उके यांनी वीज कंपन्यांमध्ये करण्यात येत असलेल्या फेरचनेला आणि खासगीकरणाला विरोध करून संप पुकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.