पुणे : शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे गावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी कायम असते. त्यातच रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर (९ ऑगस्ट) आला असताना मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या ठिकाणी जादा बस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने केले आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या स्थानकांमधून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त (८ ते ११ ऑगस्टपर्यंत) या जादा बस चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि वेळेत प्रवास करता येणार आहे.
‘व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि इतर कामानिमित्त पुणे शहरात स्थलांतर केलेल्यांची संख्या जास्त आहे. सुट्टी आणि सणानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या नियमित असते. रक्षाबंधन सण शनिवारी (९ ऑगस्ट) सुट्टीच्या वारी आल्याने प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या मार्गांवर ई-शिवनेरी, ई-शिवाई या आराम-निमआराम तसेच वातानूकुलित गाड्यांबरोबर ‘एसटी’ सोडण्याचे नियोजन केले आहे,’ अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभागाचे नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.
‘सध्या पुण्यातील स्वारगेटवरून कोल्हापूर मार्गावर प्रति दिवस ४० फेऱ्या, मुंबई येथे ७० फेऱ्या, सोलापूर येथे ४५ पेक्षा अधिक फेऱ्या सुरू आहेत, तर शिवाजीनगर बस स्थानकावरून नाशिक येथे ३५ फेऱ्या, तर छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास ६० फेऱ्या दिवसभरातून होत असतात. शनिवार, रविवारी फेऱ्यांमध्ये मागणीनुसार वाढही करण्यात येत असली, तरी रक्षाबंधन शनिवारी आल्याने या स्थानकांवरून जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे,’ असेही सिया यांनी सांगितले.
आरक्षण करून प्रवास करण्याचे आवाहन
प्रवाशांना आगाऊ आरक्षणासाठी ऑनलाईन माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, तर मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार या गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण करून प्रवास निश्चित करावा. गर्दी टाळावी असे आवाहन सिया यांनी केले.