पिंपरी : मुळशी तालुक्यातील सुस परिसरातील २७ कोटी ९१ लाख रुपये किंमतीच्या १३ हेक्टर जमीनीची विक्री करण्‍यास माजी न्‍यायमूर्तीच्या समितीने मनाई केली असतानाही जमिनीची परस्‍पर विक्री करत फसवणूक केली. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिल्ली, पुणे, सांगली, पिंपरी-चिंचवड परिसरातील दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण दहा वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्या कंपनीतील गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी माजी न्यायमूर्तीची समितीची स्थापना करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी जमीन संरक्षित ठेवली होती. मात्र, आरोपींनी संगनमत करून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बनावट दस्तऐवज तयार करून या जमिनीची २७ कोटी ९१ लाख रुपयांना परस्‍पर विक्री करून फसवणूक केली. बावधन पोलीस याबाबत तपास करत आहेत.

मद्य पाजण्यास नकार दिल्याने मारहाण

मद्य पाजण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हे जेवण करण्यासाठी एका हॉटेलसमोर गेले होते. यावेळी आरोपीने फिर्यादीला ‘मला मद्य पाज’ असे सांगितले. फिर्यादीने मद्य पाजण्यास नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करत, हाताने मारहाण करून त्याला जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

मोटारीची ट्रकला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गहुंजे येथे भरधाव वेगात असलेल्या मोटारीने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारीतील द्वारकाप्रसाद लाडूराम शर्मा (७८) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार हयगयीने आणि भरधाव वेगात चालवली. त्याने फिर्यादीच्या ताब्यातील ट्रकला मागून धडक देऊन अपघात केला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी गावात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एका तरुणाला बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केल्या प्रकरणी अटक केली. ही कारवाई शनिवारी (१८ ऑक्टोबर) करण्यात आली. रोहित अमृतलाल मौर्य (२३, पवारनगर, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित मौर्य याने त्याच्या टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी गुटखा, गुटखा बनविण्याचे साहित्य आणि मशीन असा एकूण ३९ हजार ५७५ रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री पिंपळे निलख येथे करण्यात आली. गणेश बाबुराव कारके (३१, क्रांतीनगर, पिंपळे निलख) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई किरण खडकउमरगे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कारके याने लोखंडी तलवार बेकायदेशीररित्या जवळ बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी सात अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात; सहा पिस्तूल, सहा काडतुसे जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पिंपरी आणि गुन्हे शाखा युनिट तीनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात अल्पवयीन मुलांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई पिंपरी पोलिसांनी डेअरी फार्म रस्त्यावर केली. चार अल्पवयीन मुलांकडून चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई दत्ताजी कवठेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अल्पवयीन मुले आणि त्यांना पिस्तूल पुरवणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेअरी फार्म रस्त्यावर चार मुले पिस्तूल घेऊन कोणाला तरी भेटण्यासाठी आली असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन लाख दोन हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

दुसरी कारवाई मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली. तीन अल्पवयीन मुलांसह चोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेवस्ती येथील भीमशक्ती नगर येथे चौघेजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अथर्व मारणे याला अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.