पुणे : गेल्या काही दिवसांत थंडीने जोर धरत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याची हवा बिघडली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने पुढील दोन दिवसांत मुंबईतील हवा अतिधोकादायक, तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या ‘सफर’ प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार हवेच्या गुणवत्तेचे चांगली, समाधानकारक, सामान्य, धोकादायक, अतिधोकायदायक  असे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार मुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्यामुळे या दोन्ही शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्याची हवा धोकादायक आणि मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.

पुण्यात शिवाजीनगर परिसरात अतिधोकादायक पातळी, हडपसर, कोथरूड परिसरात हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर असू शकते. तर मुंबईतील कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबुर, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक, तर भांडुप परिसरातील हवा धोकादायक पातळीवर असू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

काळजी आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खालावलेली गुणवत्ता आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यात श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे असे प्रकार होऊ शकतात.  त्यातही विशेषत: अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक परिश्रमाची कामे टाळावीत, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सतत खोकला येऊ लागल्यास, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास त्वरित औषधे घ्यावीत. आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.