पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांंमुळे वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या पथ विभागासह क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर यासाठी अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजवून घेणार आहेत. या मोहिमेला आयुक्तांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
सारसबाग येथील सणस मैदानासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील खराब रस्ता खरवडून (मिलिंग) आणि तेथे डांबर वापरून पडलेले खड्डे बुजवून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर या वेळी उपस्थित होते.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. विविध विकासकामांसाठी रस्ते खोदण्यात आले असून, त्यानंतर आवश्यक ती काळजी न घेता रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांची आणि पदपथांमध्ये खोदाई केलेली आहे.
त्यामुळे देखील शहरातील अनेक ठिकाणी रस्ते व फूटपाथ अत्यंत खराब स्थितीत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प पुणे महानगरपालिकेने केला आहे. याची सुरुवात सोमवारी करण्यात आली. शहरातील सर्व भागांमधील रस्त्यांवरील खड्डेमुक्त अभियानांतर्गत रस्त्याबद्दल खड्डे बुजवण्याची प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. हे काम करताना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर काही ठेकेदारांनी काम करण्याची तयारी दाखविली आहे. त्यांची यामध्ये मदत घेऊन ही कामे केली जाणार असल्याचे महापालिका प्रशसनाने स्पष्ट केले.
पथ विभागाचे मुख्य अभियंता पावसकर म्हणाले, ‘या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहराच्या जुन्या हद्दीतील रस्ते घेण्यात आले आहेत. संपूर्ण शहरातील रस्त्यांवर ही मोहीम राबवून खड्डे बुजविले जाणार आहेत. यासाठी पथ विभागाचे अभियंते आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंते यांची पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याबरोबर ठेकेदाराचे कर्मचारी असतील. नेमून दिलेल्या हद्दीत ही पथके फिरून स्वत:हून खड्ड्यांचा शोध घेतील आणि योग्य पद्धतीने हे खड्डे बुजवतील. महिनाभर ही मोहीम राबविली जाईल.’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिकेने रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी यामध्ये काम करण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
