पुणे महापालिकेसह नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील ५७१ शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार होते. मात्र, आता जिल्हा परिषदेने धोरण बदलले असून ऑनलाइन बदली प्रक्रियेत त्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे रिक्त जागी शिक्षकांना हजर व्हावे लागणार असून सोयीनुसार त्याच शिक्षकांना बदली मिळू शकणार आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट ३५ गावांमधील ६६ शाळांमध्ये सध्या ४१३ शिक्षक कार्यरत आहेत. बारामती तालुक्यातील चार गावांमधील नऊ शाळांमध्ये ५७ शिक्षक आहेत. पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या मुळशी तालुक्यातील ९६ शिक्षक तसेच उर्दू माध्यमातील पाच शिक्षकांचा समायोजन करण्याच्या प्रक्रियेत समावेश होता. मात्र, राज्य सरकारच्या ७ एप्रिल २०२१ च्या आदेशानुसार शिक्षकांना ऑफलाइन समुपदेशनाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे या ५७१ शिक्षकांचे थेट समायोजन करण्याऐवजी आता त्यांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत समावेश करण्यात आले आहे. परिणामी, त्या शिक्षकांच्या समुपदेशनाअभावी ऑनलाइन प्रक्रियेनुसार बदली होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली.

ज्या शिक्षकांना एकाच ठिकाणी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत असे शिक्षक बदलीस पात्र ठरत आहेत. त्यांना ज्येष्ठतेनुसार सोयीच्या ठिकाणी बदली मागता येणार आहे. जे शिक्षक बदलीस पात्र नाहीत किंवा ज्यांनी अर्ज भरलेला नाही अशांची रिक्त जागांनुसार बदली करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या दहा हजार ९५३ शिक्षकांनी या बदली प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. समाविष्ट गावातील ५७१ शिक्षकांनी ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी माहिती भरली आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

महापालिकेसह नगरपालिकेत समायोजनची मागणी मागे पडली

पुणे महापालिकेतील २३ गावांचा नुकताच समावेश झाला. त्यापूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय बारामती, माळेगावसारख्या नगरपालिकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे तेथील शिक्षक, पदवीधर आणि मुख्याध्यापक अशा ५७१ शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने पूर्वी केले होते. आता ते धोरण बदलण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेसह नगरपालिकेत समायोजन करण्याची मागणी मागे पडली आहे.