पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांची माहिती जाहीर होण्याच्या आदल्या दिवशीच राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. थकीत मिळकतकरदारांना दिलासा देण्यासाठी अभय योजना आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाची सोमवारी बैठक देखील झाली.

महापालिकेचा अनेक नागरिकांनी मिळकत कर भरलेला नाही. त्यामुळे मिळकत करायची मूळ रक्कम आणि त्यावर प्रत्येक महिन्याला दोन टक्के व्याजाची रक्कम असा आकडा १३ हजार कोटींच्या घरात गेला आहे. यामध्ये व्याजाची रक्कम दहा हजार कोटी रुपयांच्या घरात असून मूळ रक्कम तीन हजार कोटी रुपये आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी महापालिकेत अभय योजना राबवून दिलासा देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी सुरू केला आहे. मात्र, या योजनेचा स्वयंसेवी संस्थांसह काही सामाजिक संस्थांनी विरोध दर्शविला आहे.

थकित मिळकत कराची वसुली वाढावी, यासाठी पुणे महापालिका मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा विचार करत आहे. मात्र, हा विचार करण्याआधी पुणे महापालिकेने २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षी आणलेल्या अभय योजनांच्या फलितांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोट्यवधी रुपयांचा थकलेला मिळकतकरदारांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची टीका सर्व नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली.

वेलणकर म्हणाले, मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने २०२०-२१ मध्ये अभय योजना आणली होती, या योजनेचा १ लाख ४९ हजार,६८३ थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेत कर भरला. मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफीपोटी महापालिकेचे २१० कोटी रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेने लगेचच २०२१-२२ मध्ये पुन्हा एकदा मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून  अभय योजना आणली होती, या योजनेचा ६६ हजार ४५४  थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला.

या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफीपोटी महापालिकेचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आम्ही त्यावेळीही या योजनांमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरीकांवर याचा परीणाम होतो अशी भीती व्यक्त केली होती. हे थकबाकीदार सोकावतील आणि नवीन अभय योजना येईपर्यंत कर भरणार नाहीत असेही लिहिले होते. दुर्दैवाने आमची भीती खरी ठरली. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे माहिती अधिकारात मी माहिती मागितली की या  अभय योजनांचा फायदा घेतलेल्यांपैकी किती मालमत्ता धारक ३१ डिसेंबर २४  अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. त्यांनी कर भरलेला नाही.

ही माहिती अत्यंत धक्कादायक होती. २०२०-२१ मध्ये ज्या १ लाख ४९ हजार ६८३ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला.  त्यापैकी ६३५१८ (४२%) मालमत्ताधारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर‌ २०२१-२२ मध्ये ज्या६६४५४  थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ४४६८५ ( ६७%) मालमत्ता धारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत.

महापालिकेने यापूर्वी राबवलेल्या मिळकतकर अभय योजनेचा विचार करता नवीन मिळकतकर  अभय योजना आणण्याचा विचारही महापालिकेने करू नये.  त्यानंतरही महापालिका अट्टाहासाने अभय योजना आणणारच असेल तर याआधीच्या अभय योजनांचा फायदा घेतल्यानंतरही जे मालमत्ताधारक पुन्हा एकदा थकबाकीदार झाले आहेत. त्यांना पुन्हा नवीन योजनेत सहभागी होऊ देऊ नये. जे थकबाकीदार नवीन अभय योजनेत सहभागी होऊ इच्छितात त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरुन घ्यावे ज्यात लाभधारक थकबाकीदार भविष्यात कधीही पुन्हा  थकबाकीदार झाला तर आत्ताच्या अभय योजनेत माफी दिलेली दंड व व्याजाची रक्कम त्याच्याकडून वसूल केली जाईल, असे स्पष्ट लिहिलेले असावे. अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.