Murlidhar Mohol On Pune Jain Boarding House Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहार प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे पुण्यात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या आरोपांवर आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच या व्यवहारात माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत सर्व आरोप मोहोळ यांनी फेटाळून लावले आहेत.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
“मी गेले चार ते पाच दिवस पुण्यात नव्हतो. पण माध्यमांमध्ये मी काही वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या. राजू शेट्टी आणि पुण्यातील नेत्याने आरोप केले म्हणून मी हे स्पष्टीकरण देत नाही, तर ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलं, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की आमच्या खासदाराने चांगलं काम केलं पाहिजे, लोकांची भावना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. पण मागच्या पाच ते सहा दिवसांत नक्कीच माझ्या पुणेकरांच्या मनात कुठेतरी शंका आली असेल की या प्रकरणात तथ्य काय आहे? यामध्ये सत्य काय आहे? म्हणून त्यांच्यासाठी आज मी स्पष्टीकरण देत आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
“मी या प्रकरणाच्या खोलाच जाऊन सविस्तर माहिती आज तुमच्यासमोर आणली आहे. राजू शेट्टी हे महाराष्ट्रातील शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबाबत माझ्या मनात आजही आदर आहे. मात्र, एवढा मोठा आरोप एखाद्या नेत्यावर करत असताना एकदा त्यांनी माझ्यांशी संवाद साधला असता तर मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली असती आणि मग त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले नसते”, असं मोहोळ म्हणाले आहेत.
जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावर मोहोळ काय म्हणाले?
“जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाचं जे खरेदी खत झालं, हा व्यवहार करताना पुण्यातील गोखले बिल्डर्सने ते विकत घेतलं. मात्र, माझ्यावर असा आरोप झाला की, गोखले बिल्डर्सचा मी भागीदार आहे. मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केलं की, मी शेती व्यवसाय करतो, मी दोन ठिकाणी कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. गेले १५ ते २० वर्षांत मी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम व्यवसाय करतो. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? स्वच्छ व्यवसाय केला. मला काहीही लपवण्याची गरज नाही”, असं मोहोळ म्हणाले.
“गोखले यांच्याबरोबर मी प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहिती प्रमाणे दोन एलएलपी संस्था होत्या, या दोन भागीदारी संस्था आहेत, त्यातील एक संस्था २०२२ मध्ये आणि दुसरी २०२३ मध्ये तयार झाली होती. मी या एलएलपी संस्थांमधून बाहेर पडायच्या आधी देखील एकही रुपयांचा व्यवहार या दोन्ही संस्थांमधून झालेला नाही. हे सर्वजण तपासू शकता. आता जैन बोर्डिंग हाऊसच्या विषयाबाबत सांगतो की या दोन्ही एलएलपीचा मी राजीनामा देऊन २५ नोव्हेंबर २०२४ मध्ये बाहेर पडलो होतो. त्याचे हे माझ्याकडे कागदपत्रे आहेत”, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
“जैन बोर्डिंगच्या ट्रस्ट्रींनी १६ डिसेंबर २०२४ मध्ये ही जमीन विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक वर्तमान पत्रात या संदर्भातील त्यांनी टेंडर नोटीस देखील दिली होती. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर गोखलेंनी ही जमीन ८ ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतली, म्हणजे तुम्ही पाहिलं तर हा व्यवहार कधी झाला ८ ऑक्टोबर २०२५ मध्ये आणि मी बाहेर कधी पडलो २०२४ मध्ये. मग माझा या विषयांशी संबंध कुठे आला?”, असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलं आहे.