पुणे : ‘महाराष्ट्रातील मुलांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हिंदी आणि इंग्रजी भाषा आली पाहिजे, हिंदी भाषा शिकविण्यात गैर काही नाही,’ असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी म्हणाले. ‘एकाच विषयावर किती दिवस राजकारण करावे, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ओळखते. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवते,’ असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ४४ व्या स्थापना दिनानिमित्त सहकार शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदर येथील सभेत हिंदी सक्ती केल्यास दुकानेच नाही, तर शाळा बंद करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांना प्रश्न विचारला असता, ते बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेचे परिपत्रक मागे घेऊन महाराष्ट्रात मराठी हीच भाषा सक्तीची असेल, असे सांगितले आहे. तरीही काही जण या विषयावर राजकारण करत आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी करावे. हिंदी भाषेबाबत गैर काही नाही, अशी सरकार आणि पक्षाची भूमिका आहे.’