पुणे : मंडई मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, अनैसर्गिक संबंधांतून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहिल्यानगरमधील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. त्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. मु. पो. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, अनिकेत बाबर, नीलेश साबळे आणि पथकाने केली.

मंडई मेट्रो स्थानक परिसरातील मोकळ्या जागेत एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केली असता, त्याच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांनी तपास सुरू केला. मयत व्यक्ती फिरस्ता असल्याचे समोर आले. पण, त्याची ओळख मात्र पटली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचदरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की रमेश सत्रे नावाच्या व्यक्तीने हा खून केला आहे. त्यानुसार रमेशचा शोध सुरू केला. रमेश याला शिरूर तालुक्यातून पकडले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. रमेश व्यसनी आहे, तर मयत फिरस्ता होता. त्यालाही दारूचे व्यसन होते. मयत व्यक्तीने मध्यरात्री रमेशकडे दारू मागितली होती. तेव्हा रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्यात वादविवाद झाले. रागाच्या भरात रमेशने चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.