scorecardresearch

“आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र होणार”, नाना पटोलेंचे विधान; मोदींवर टीका करत म्हणाले, “निवडणुका आल्या की..”

नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपाला नाकारले असून, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतदेखील भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

nana patole on pm modi
"आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र होणार", नाना पटोलेंचे विधान (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची एकही जागा निवडून येणार नसून, भाजपामुक्त महाराष्ट्र होणार आहे”, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आलेले नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सदर विधान केले.

“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेजण निवडणुका आल्या की, फिरत राहतात. पण अन्य वेळी कुठेही दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पुण्यात विधान केल की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या सर्व जागा येणार असल्याचा संकल्प केला आहे. पण देशातील आणि राज्यातील जनतेने मोदी आणि शहा यांना चांगलेच ओळखले आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपाला नाकारले असून, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतदेखील भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची एकही जागा निवडून येणार नसून, भाजपामुक्त महाराष्ट्र होणार आहे”, अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली.

नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे नेते खासदार गिरीश बापट यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली असून, त्यांची तब्येत ठीक नाही. गिरीश बापट यांना आरामाची गरज असताना भाजपा नेत्यांनी त्यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराकरीता उतरविले आहे. यातून भाजपा नेतृत्वाची मानसिकता दिसून येत आहे. तसेच अमित शहा यांनादेखील पुण्यात यावे लागले. यामधून भाजपा नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

हेही वाचा – चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस

हेही वाचा – संजय काकडे यांच्या भूगावमधील बेकायदा बांधकामाच्या चौकशीचे आदेश, राज्य मानवी हक्क आयोगाकडे जमीन मालकाची तक्रार

केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन भाजपाने शिवसेनचे धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. पण आजवर देशात अशा घटना घडल्या. त्यानंतर त्या पक्षाला जनतेने नाकारले आहे. हेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतदेखील घडणार, असे पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 17:07 IST