पुणे : ऊतीसंवर्धनाद्वारे (टिश्यू कल्चर) वाढवलेल्या बहुतेक सर्व वनस्पती रोगमुक्त आणि गुणवत्तेत समान आहेत. गेल्या चार वर्षांत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्चने ६५ कोटी वनस्पती प्रमाणित केल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, गुणवत्ता नियंत्रण मानकांची पूर्तता न करणारी सुमारे ३५ लाख रोपे नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे खराब दर्जाच्या आणि रोगट झाडांचा प्रसार रोखला गेला आहे, अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्चचे संचालक डॉ. देबाशिष चट्टोपाध्याय यांनी दिली.

नवी दिल्लीतील ब्रिक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च (एनआयपीजीआर), राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे) यांच्या तर्फे नाजूक रोपांपासून समृद्ध परिसंस्थेपर्यंत या ऊतीसंवर्धनाने वाढवलेल्या वनस्पतींसाठी राष्ट्रीय प्रमाणन प्रणाली जागरूकता कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राज्यातील वनस्पती ऊतीसंवर्धन उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयसर पुणेतील संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा. अंजनकुमार बॅनर्जी, एनसीएस-टीसीपीचे समन्वयक अधिकारी डॉ. मनोजकुमार मोदी, प्लांट टिश्यू कल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव प्रा. प्रमोद टंडन, मुख्य संशोधक डॉ. आशुतोष पांडे या वेळी उपस्थित होते.

डॉ. मोदी म्हणाले, ‘टिश्यू कल्चरद्वारे वाढवलेल्या वनस्पतींसाठी डीबीटीचा प्रमाणन कार्यक्रम २००६ मध्ये सुरू करण्यात आला. विषाणूमुक्त आणि आनुवंशिकदृष्ट्या एकसमान वनस्पतींचे उत्पादन करणे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी टिश्यू कल्चर वनस्पतींचे उत्पादन, वापरण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आतापर्यंत १.४ अब्ज टिश्यू कल्चर वनस्पती प्रमाणित करण्यात आल्या आहेत.

प्रमाणन प्रक्रिया उच्च उत्पादकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करते, शेतकरी आणि उद्योगांचा आत्मविश्वास वाढवते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते. भविष्यात टिश्यू कल्चर सुविधांनी उत्पादन सुधारण्यासाठी क्रिस्पर तंत्रज्ञान आणि स्वयंचलित सूक्ष्मप्रसार प्रणाली अशा नवीन तंत्रांचा समावेश करून संशोधन केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी तांत्रिक व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे, उद्योजकांनी नवीन बाजारपेठा शोधणे महत्त्वाचे आहे, असे प्रा. टंडन यांनी नमूद केले.