पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. तर या बैठकीला अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार दत्तात्रय भरणे, शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे, भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित आहे.
आणखी वाचा- लोकसभेसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे गटाकडे किती जागा? संजय राऊत म्हणतात…!
मागील काही वर्षात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. पण आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अनेक वर्षानंतर हजेरी लावली आहे. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघात नेलेल्या विकास निधीला विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्री लावली होती. त्यानंतर निधी कपतीवरून चर्चेचे गुराळ सुरू झाले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होते.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.