लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल सासरे यांच्याकडून मारहाण झाल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अधिकार्याला राहत्या घरात डांबून ठेवून नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचे त्याने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणात यापूर्वी पत्नीने मेजर पदावर असलेल्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद नोंदवली आहे. लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीसह सासू-सासर्यांवर मारहाण, धमकावल्याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मेजर आहेत. त्यांच्या पत्नीने न्यायाधीश पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्या एका विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचे वडील हे निवृत्त कर्नल आहेत.
हेही वाचा… वर्षभर जाणविणार आंब्याच्या पल्पचा तुटवडा; खर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले
डिसेंबर २०२२ मध्ये पती-पत्नीचा कौटुंबिक वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि सासू-सासर्यांनी फिर्यादी यांना राहत्या घरात डांबून ठेवले. त्यांना कामावर जाण्यास अटकाव केला. तसेच त्यांना शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची आणि कोर्ट मार्शल करण्याची धमकी देत मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शबनम शेख याप्रकरणी तपास करीत आहेत.