लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठात अमृत उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. हत्तीखान्याच्या सरोवराजवळ साकारत असलेल्या या उद्यानात ७५ आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी वृक्षारोपण करून अमृत उद्यान निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ केला. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे या वेळी उपस्थित होती. विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने उद्यान निर्मितीचा प्रस्ताव मांडला होता. कुलगुरूंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार आता या उद्यानाची निर्मिती करण्यासाठी ७५ आयुर्वेदिक वनस्पतींचे रोपण करण्यात आले.

हेही वाचा… मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करणार ‘डीपीसी’च्या निधीची ‘वाटणी’?

डॉ. गोसावी म्हणाले, की आयुर्वेदिक वनस्पती उद्यान हे अनोखे ठरणार आहे. वनस्पतीशास्त्र किंवा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वनस्पतींची गरज असते. त्यामुळे स्वत:चे उद्यान असावे ही कल्पना होती. अलीकडेच विद्यापीठातील हत्तीखान्याच्या सरोवराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच नक्षत्र उद्यानही साकारण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर चांगल्या पद्धतीने विकसित होईल.

हेही वाचा… पुणे : शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे ठप्प; येरवड्यातील ‘हॉटमिक्स’ प्रकल्प नादुरुस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्यानातील वनस्पती उद्यानामध्ये ७५ आयुर्वेदिक आणि देशी वनस्पतींचा समावेश आहे. त्यात रुद्राक्ष, पळस, अर्जून, शिकेकाई, हिरडा, बेहडा, रिठा, कदंब, कापूर, आवळा, शमी, सीताअशोक, गुग्गुळ, मेहंदी, बेल, आपटा, बकुळ, अजानवृक्ष, नागकेशर, उंबर, रोहितक, डिकेमाळ, चारोळी, करंज, काटेसावर, शिसम, कडुनिंब, बूच, कृष्णवड, बिब्बा, कांचन, सुरंगी, कुसुम, मुरुडशेंग, गोरखचिंच, पांगारा, सेंद्री, मंदार, आपटा, भोकर, खैर, रक्तचंदन, अंजन, पुत्रांजीवा, तुती, कैलास्पती, लक्ष्मीतरू अशांचा समावेश आहे.