पुणे : ‘देशात विमानतळ नसलेल्या ठिकाणी हेलिकाॅप्टर आणि लघु विमानांच्या उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच स्वतंत्र हवाई वाहतूक धोरण राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी मंगळवारी येथे दिली.

नायडू एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘उडान योजनेमुळे हवाई क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. मात्र, भौगोलिक आणि निसर्गरचनेनुसार डोंगराळ, दुर्गम भागात हेलिकाॅप्टर आणि लघु विमानांना अडथळे येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र वाहतूक धोरणाची आवश्यकता आहे. विमानतळ नसलेल्या भागात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) पायाभूत सुविधा विकसित करून हवाई क्षेत्रातील दळणवळण सुविधा आणखी सुलभ करण्यात येणार आहे.’

‘भौगोलिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी विविध यंत्रणांची गरज आहे. विमानतळ उभारणे शक्य नाही, अशा दुर्गम भागात हेलिकॉप्टरचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे,’ असे ते म्हणाले.

‘सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य’

‘चारधाम यात्रेच्या ठिकाणांवर खराब हवामान आणि डोंगराळ प्रदेश असल्याने हेलिकाॅप्टरला अडथळे येत आहेत. तसेच, दुर्घटना टाळण्यासाठी हवाई वाहतूक व्यवस्थापनात (एटीएमएस) ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे,’ असेही किंजारापू राममोहन नायडू यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बेकायदा बांधकामांवर लक्ष’

पुणे, मुंबई, अहमदाबाद यांसारख्या गर्दीच्या विमानतळ परिसरात बेकायदा बांधकामे वाढली आहेत. त्यामुळे हवाई अपघातांची शक्यता असून, उड्डाणांमध्येही अडथळे येत आहेत. त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याचे किंजारापू राममोहन नायडू यांनी स्पष्ट केले.