पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा ३० किलोमीटर लांबीचा पुणे-नाशिक महामार्ग उन्नत होणार आहे. त्यामुळे सध्या या मार्गादरम्यान प्रवासासाठी लागणारा दीड-दोन तासांचा कालावधी अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. त्याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, २५ सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ‘एनएचएआय’ने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीने ९० टक्क्यांपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे १४ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या मार्गाचा प्रवेशमार्ग आणि निर्गमन असा ३० किलोमीटरचा परिसर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत येतो. मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी ऑक्टोबरपूर्वी भूसंपादन पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, ८० टक्के भूसंपादन पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येत नसल्याचे ‘एनएचएआय’कडून बैठकीत सांगण्यात आले.
शहरी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात विद्यमान पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि उन्नत मार्गिका बांधणे समाविष्ट आहे. केंद्राने गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी ७८२७ कोटी रुपये मंजूर केले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) जोडणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातील १५० जमीन मालकांच्या मालकीची ९.७४ हेक्टर जमीन संपादनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
प्रस्तावित जमीन ही नाणेकरवडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी, चाकणचा काही भाग या गावांतील आहे. भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी शक्य असेल, तेथे हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देऊन भूसंपादन करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी आणि मोशी यांसारख्या भागातील भूसंपादन आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बहुतांश जमीन टीडीआर आणि ‘एफएसआय’च्या बदल्यात आधीच मिळविण्यात आली आहे. उर्वरित जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारकडे आर्थिक मदत मागण्यात आली आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकल्पाचा आढावा
- मार्गिका प्रस्तावित गावे – एकूण सात
- एकूण लांबी ३० किलोमीटर
- प्रवेश मार्गिका – १० आगमन आणि निर्गमनमार्ग असतील
- अपेक्षित भूसंपादन – १४ हेक्टर
- अपेक्षित खर्च – ७८२७ कोटी रुपये
- निविदा प्रक्रियेची अंतिम मुदत – २५ सप्टेंबर
अतिरिक्त कामे सुरू
या उन्नत मार्गिका प्रकल्पासोबतच बालेवाडी ते शेडगे वस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे-माण रोड यासह अनेक रस्ते विस्ताराची कामे सुरू आहेत. बहुप्रतिक्षित पुणे वर्तुळाकार रस्त्याचे कामही टप्प्याटप्प्याने सुरू आहे, अनेक ठिकाणी भूसंपादन जवळजवळ पूर्ण झाले आहे. एकत्रितपणे, या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्दिष्ट शहरी गतिशीलता सुव्यवस्थित करणे आणि प्रदेशाच्या जलद औद्योगिक आणि निवासी विकासाला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे.
‘एनएचएआय’कडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी ९० टक्के भूसंपादन आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन आणि ‘पीएमआरडीए’ यांना ९० टक्के भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत. भूसंपादन होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.- संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय