पुणे : ‘समृद्धीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. शेतीमध्ये एक दाणा पेरल्यानंतर शंभर येतात. आपल्याला हवे तेवढे ठेवून बाकीचे लोकांना वाटू या. आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले, तर गंमत आहे. रंगमंचावर आल्यानंतर ‘नमस्कार मी गुलाबराव जाधव,’ असे म्हणण्याचा मोह होतो. इथे यायचे आणि कुस्ती खेळायची नाही हे काही बरोबर नाही. पण, सामाजिक कामातून मिळणारा आनंद ही नवीन कुस्ती चांगली वाटत आहे,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी व्यक्त केली. ‘दळवी पॅटर्न’ हे काम एकापुरते राहता कामा नये. यामध्ये पुढची पिढी तयार झाली पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
सत्त्व फाउंडेशनच्या वतीने माजी प्रशासकीय अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण आणि स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला आलेल्या निढळ (ता. खटाव, जि. सातारा) या गावाची प्रगतशील वाटचाल उलगडणाऱ्या ‘निढळ : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे या वेळी उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, ‘अनेक चंद्रकांत का घडत नाहीत? आपण आपल्यातला चंद्रकांत शोधावा. बाहेर गेलेल्या माणसांना गावाची ओढ असली पाहिजे. सामूहिक विकासामुळे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. केवळ शाळा, पाणी, आरोग्य यावर काम होत नाही. सध्या जातीय तेढ आहे. जात-धर्मामध्ये विभागणी करून राजकारणी फायदा उठवत आहेत. पण सामूहिक कामातून लोक एकत्र येतात. समविचारी लोकांना घेऊन ४१ वर्षे काम केले. मी सामान्य आहे, ही ताकद असून त्याचाच मला आनंद आहे. कुटुंब चार भिंतीपुरते नको. ही भिंत पाडण्याची क्षमता प्रत्येकात आहे.’
‘गावाचा विकास कसा करावा, याचे कोणतेही धोरण किंवा व्याख्या जगात नाही. निढळ गावात कामाला सुरुवात केली. २०४७ मध्ये विकसित होण्यासाठी काम सुरू आहे. देशात पाच हजार शहरे, राज्यात ४२ हजार गावे आणि देशात सात लाख खेडी आहेत. शहरी भारत दहा वर्षांत विकसित होईल, पण खेडी सुधारली पाहिजेत. ग्रामीण भारत सुधारल्याशिवाय देश विकसित कसा होणार? शासनाच्या योजना, लोकसहभाग, लोकवर्गणी यातून निढळ गावाचा विकास केला,’ असे दळवी यांनी सांगितले.
ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये. ‘दळवी पॅटर्न’ सर्वत्र पोहोचण्यासाठी अभ्यासक्रमाचा भाग व्हावे. त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा मिळावी. – नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते