बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीत प्रथमच चौरंगी लढत होणार आहे. चिन्ह वाटपाच्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
चिन्ह वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलला ‘कप-बशी’, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला (किटली) आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती पॅनेलला (छत्री) हे चिन्ह मिळाले आहे.
या कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या वतीने नीरा वागज येथे प्रचाराचा प्रारंभ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सत्ताधारी ‘श्री नीलकंठेश्वर पॅनेल’च्या प्रचाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी माळेगाव येथून सुरुवात होणार आहे.
‘तुतारी’ वाजणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ या चिन्हाचा फटका या पक्षाला बसला होता. मात्र, कारखान्याच्या निवडणुकीत या पक्षाच्या पॅनेलला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत ‘तुतारी’ वाजणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.