स्वत: दृष्टिहीन असून आपल्या दृष्टिहीन बांधवांना दृष्टी मिळवून देणाऱ्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे प्रमुख आणि पुणे अंध जन मंडळाचे (पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशन) कार्यकारी संचालक निरंजन पंडय़ा (वय ७१) यांचे कर्करोगाने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल २०१२ मध्ये पंडय़ा यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला होता.
निरंजन प्राणशंकर पंडय़ा यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४५ रोजी पुण्यात झाला. आर. सी. एम. गुजराथी हायस्कूलमधून त्यांनी पदवीचे शिक्षण सुरू असताना क्रिकेटचा चेंडू त्यांच्या डोळ्यांवर बसला. या दुर्दैवी अपघातामध्ये वयाच्या १७ व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. मात्र, या परिस्थितीमध्ये न डगमगता प्राचार्य दादावाला यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवी संपादन केली. तुकाराम सहदेव ऊर्फ टी. एस. बमणकर यांनी स्थापन केलेल्या पुणे अंध जन मंडळामध्ये पंडय़ा कार्यकर्ता म्हणून दाखल झाले. या संस्थेचे सचिव आणि मुख्य कार्यकारी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुणे अंध जन मंडळ संस्थेला ‘वर्ल्ड ब्लाइंड युनियन’चे संलग्नत्व संपादन करून देण्यामध्ये पंडय़ा यांचे योगदान होते. या माध्यमातून पंडय़ा यांना जर्मनी, नेदरलँड आणि स्वित्र्झलड या देशांचा दौरा करण्याची आणि तेथील दृष्टिहीनांच्या पुनर्वसनासंदर्भात अभ्यास करण्याची संधी मिळाली. तेथून परतल्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये दृष्टिहीनांसाठी तांत्रिक प्रशिक्षण संस्था सुरू केली.
अमेरिका भेटीमध्ये तेथून निधी संकलित करून पंडय़ा यांनी १९८४ मध्ये दृष्टिहीन ज्येष्ठ महिलांसाठी शिर्डी साईबाबा होम सुरू केले. रशिया दौऱ्यावरून परतल्यानंतर पुणे अंध जन मंडळामध्ये त्यांनी दृष्टिहीनांसाठी ‘टॉकिंग बुक लायब्ररी’ सुरू केली. दिल्ली येथे १९९९ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञांच्या परिषदेत शोधनिबंध सादर करून पंडय़ा ‘व्हिजन ९९’ परिषदेसाठी न्यूयॉर्कला गेले. अमेरिका दौऱ्यानंतर पंडय़ा यांनी २००० मध्ये महमंदवाडी येथे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल सुरू केले. गरजू रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करणाऱ्या हॉस्पिटलचा आतापर्यंत ३ लाख ६७ नेत्ररुग्णांनी लाभ घेतला आहे. पंडय़ा यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यांचा गौरव केला होता. ‘दृष्टिदूत’ अशी ओळख असलेल्या पंडय़ा यांनी अनेकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेतला आहे.