लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उजनी जलाशयाच्या बोटीतून प्रवास करताना बोट उलटल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत लवकरच नियमावली करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी दिली. नियमावली केल्यानंतर प्रत्येक बोट आणि बोटधारकाची नोंद तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे असेल. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात टाळता येतील, असेही डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

उजनी धरणाच्या जलाशयात मासेमारीसाठी बोटींचा वापर करण्यात येतो. याची परवानगी जलसंपदा विभागाकडून संबंधितांना दिली जाते. मात्र, काही स्थानिक बोटधारक मासेमारीच्या बोटीच प्रवासासाठी वापर करतात. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल तहसीलदारांकडून मागविण्यात आला आहे. उजनी धरणातील जलाशयातील बोटींबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार केली जाईल आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये बोट आणि बोटधारकांची नोंदणी, मासेमारी, पर्यटन, पक्षिनिरीक्षण, प्रवास अशा कोणत्या कारणांसाठी बोटीचा वापर करण्यात येणार आहे, त्या पद्धतीने बोटी आणि बोटधारकांची नोंदणी करण्यात येईल. बोटीमध्ये जीवरक्षक कवच (लाइफ जॅकेट), बोटींच्या आकारानुसार किती जणांना त्यातून प्रवास करता येईल, अशी सर्वंकष ही नियमावली असेल.

आणखी वाचा-पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”

मुंबई पोलीस अधिनियम किंवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ही नियमावली तयार करता येऊ शकेल. बोटी चालविणाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) प्रशिक्षणही देण्यात येईल. एकदा नियमावली तयार केल्यानंतर अशा प्रकारचे अपघात टाळता येतील आणि त्यातून होणारी प्राणहानीदेखील टाळता येऊ शकेल, असे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.