पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) जानेवारीच्या सुरुवातीला ५९१५ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी अर्ज करण्यापासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून त्यासाठी यंदा प्रथमच नवी संगणकप्रणाली वापरण्यात येत आहे. मात्र, सदोष संगणकप्रणाली आणि घरासाठी अर्ज करताना अपलोड करायच्या कागदपत्रांना विलंब लागत असल्याने नागरिकांचा सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला असून दोन दिवसांत घोषणा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरासाठी अर्ज करण्यापासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी म्हाडाकडून इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) २.० या प्रणालीचा अवलंब या सोडतीसाठी प्रथमच करण्यात आला. त्यानुसार ५ जानेवारीला सोडत जाहीर करण्यात आली. इच्छुकांकडून अर्ज भरण्यास सुरुवात करताच पॅनकार्ड, आधार, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मात्र, या कागदपत्रांच्या प्रमाणीकरणासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे या सोडतीला नागरिकांचा यापूर्वीसारखा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचा – ७५ टक्के अतिरिक्त कामगार डोईजड; पगारावर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

दरम्यान, मंगळवारपर्यंत ८२ हजार २८४ अर्जदारांनी सदनिका घेण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी केवळ १८ हजार ७४४ अर्जदारांच्या अर्जांची पैसे भरण्यासह पूर्ण प्रक्रिया झाली आहे. उर्वरित अर्जदारांचे अर्ज अद्याप विविध कागदपत्रांच्या प्रमाणीकरणासाठी प्रलंबित आहेत. प्रामुख्याने रहिवासी प्रमाणपत्र संगणकीकृत करूनही ६४ हजार ७६७ अर्जदारांचे अर्ज प्रलंबित आहेत.

हेही वाचा – मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे एक लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

आयएलएमएस प्रणालीनुसार ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत प्रणालीत दोनदा बदल करण्यात आले आहेत. आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणि प्रमाणीकरणासाठी देखील अर्जदारांना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No response to mhada lottery due to faulty computer system reluctance to extend deadline pune print news psg 17 ssb
First published on: 01-02-2023 at 10:49 IST