पुणे : भविष्यातील काळ हा यंत्र आणि मानव यांच्यातील सहकार्याचा असणार आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे (एआय) आतापर्यंत काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित असलेला तंत्रज्ञानाचा ओघ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत मोठी स्थित्यंतरे घडणार असून, मानवी जीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे त्यातील धोक्यांचाही विचार करावा लागेल, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ मायकेल स्पेन्स यांनी शुक्रवारी केले.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये ८४ व्या काळे स्मृती व्याख्यानात स्पेन्स बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे उपस्थित होते. स्पेन्स यांनी महत्त्वाच्या संशोधनामुळे होणारे स्थित्यंतर या वेळी उलगडून दाखविले. ते म्हणाले, की नवीन तंत्रज्ञानामुळे या पिढीला विकासाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्वंकष आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणेही शक्य होत आहे. डिजिटल स्थित्यंतरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल झाला असून, सर्वजण त्याचा भाग आहेत. हे तंत्रज्ञान सर्वाना सहजी उपलब्ध होणारे आणि मोफत मिळणारे आहे.

हेही वाचा >>>शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे? आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी बोळवण

कृत्रिम प्रज्ञा ही आता मानवी मनाप्रमाणे कार्य करते. एकच तंत्रज्ञान आता भारतीय इतिहास, इटलीतील रेनेसाँ आणि कॉम्प्युटर कोडिंग याबाबत माहिती देऊ शकते. विशेष म्हणजे अब्जावधी डॉलर खर्च करून संशोधन करणाऱ्या बडय़ा कंपन्यांपुरते हे तंत्रज्ञान मर्यादित नाही. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वाना शक्य आहे. सध्या कृत्रिम प्रज्ञेची क्षमता विकसित करत असताना ती मानवी क्षमता डोळय़ांसमोर ठेवून केली जात आहे. परंतु, भविष्यात मानवी क्षमतेपेक्षा जास्त पातळीवर ही क्षमता विकसित केली गेल्यास ती परिस्थिती धोकादायक ठरू शकते. त्यासाठी नजीकच्या भविष्यात नियंत्रण किंवा नियमनाची गरज भासेल. ही गरज विविध देशांसाठी त्यांच्या स्थानिक निकषांनुसार वेगवेगळी असेल, असे स्पेन्स यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘संशोधनाचा फायदा सर्वाना’

कृत्रिम प्रज्ञेमुळे ‘इमेज रिकग्निशन’ शक्य झाले आहे. प्रथिनांची त्रिमितीय रचना तयार करणे ही अवघड बाब असते. काही संशोधकांनी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून हे शक्य करून दाखविले. यामुळे २० कोटींहून अधिक प्रथिनांच्या त्रिमितीय रचना तयार करणे शक्य झाले असून, जगभरात सर्व संशोधकांना संशोधनासाठी ही साधने मोफत उपलब्ध आहेत. यामुळे आगामी काळात जैववैद्यकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ घडणार आहे, असे स्पेन्स यांनी नमूद केले.   

कृत्रिम प्रज्ञेबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनात भीती आहे. या तंत्रज्ञानामुळे आपला रोजगार हिरावला जाईल, असे त्यांना वाटत आहे. खासगी क्षेत्र या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याच वेळी सार्वजनिक क्षेत्र याबद्दल अजून साशंक दिसत आहे. – मायकेल स्पेन्स, ‘नोबेल’विजेते अर्थतज्ज्ञ