विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये आनंददायी अभ्यासक्रम राबवला जाणार असून, त्यात गोष्ट, छोटे खेळ, अनुभवकथन, श्वासांवरील क्रिया, मुक्त हालचाली, चालण्याची पद्धत, प्रसंगनाट्य, गाणी, कवितांचे सादरीकरण, अवांतर वाचन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांत सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, विद्यार्थ्यांचा ताण कमी करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून तयार करून घेणे या उद्देशाने आनंददायी अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी हा उपक्रम भोर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आल्यानंतर आता राज्यभरातील शाळांमध्ये या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे. सजगता, गोष्ट, कृती आणि अभिव्यक्ती अशा चार प्रकारांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शाळांना परिपाठ झाल्यानंतर पहिल्या तासातील ३५ मिनिटांमध्ये करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक दिवशी ठरलेल्या नियोजनानुसार परिपाठ झाल्यानंतर पुस्तकी शिक्षण सुरू करण्याआधी आनंददायी अभ्यासक्रम होईल.

दिवसनिहाय अभ्यासक्रमाचे नियोजन

सोमवार – सजगता

मंगळवार, बुधवार – गोष्टी सांगणे

गुरूवार, शुक्रवार – कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार – अभिव्यक्ती, छंद