पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत जवळपास तीस हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. आता निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठ पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६३ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. १३ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार प्रवेशासाठीची मुदत सोमवारी (२२ मे) संपली. या मुदतीत सुमारे ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यामुळे ३० हजार जागा रिक्त राहिल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते.

हेही वाचा >>>अबब! देशातील अतिश्रीमंतांची संख्या पाच वर्षांत ‘एवढी’ वाढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, की आता आरटीई प्रवेशांना मुदतवाढ दिली जाणार नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश, रिक्त राहिलेल्या जागा यांचा आढावा घेऊन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास चार दिवस लागतील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील.