पुणे : ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांसाठी शासनाकडून समान धोरण लागू केले असताना या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘महाज्योती’ला दुय्यम वागणूक दिली जात आहे, असा आरोप इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) नेते लक्ष्मण हाके यांनी केला. पुण्यात उभारण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या इमारतीमध्ये ‘महाज्योती’ला जागा द्यावी आणि पंधराशे कोटींचा मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाज्योतीचे दायित्व घ्यावे, अशी मागणी केली.

हाके म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतील (सारथी) जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात येते. परंतु, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संशोधक विद्याथ्यांना गेल्या वर्षांत २५ जुलै ते ३१ डिसेंबर कालावधीतील म्हणजे केवळ पाच महिने सहा दिवसांची अधिछात्रवृत्ती देण्यात आली. सारथी संस्थेबाबत निधी वाटपाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होतो. परंतु, ‘महाज्योती’ संस्थेला अधिवेशनात पुरवणी मागणी करावी लागते. एवढे करूनही दोन वेळा ही कुठलेही कारण न देता मागणी डावलली जाते. सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अधिछात्रवृत्तीसाठी आंदोलन करताच निधी मंजूर होतो, तर ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना निधीअभावी अधिछात्रवृत्ती देण्यात आलेली नाही, असा दुजाभाव सुरू आहे.’

ससाणे म्हणाले, ‘महाज्योती संस्थेला स्वतंत्र जागा अपेक्षित आहे. इतर मागासवर्गीयांसाठीच्या आर्थिक विकास महामंडळावर अद्याप अध्यक्ष नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे महामंडळाला जागा उपलब्ध करून देत विद्यार्थी संशोधनात्मक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून सुरू करावी. येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात या मागण्या मान्य कराव्यात.’ तसेच, सारथी संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीच्या तीन पट अधिक निधी महाज्योतीला देण्यात यावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कारखान्याची निवडणूक शोभत नाही’

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहणे अजित पवारांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. कारखान्यांना निधी देण्यास अर्थमंत्र्यांकडे पैसा आहे. मात्र, ‘महाज्योती’च्या संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछत्रवृत्ती देण्यास यांच्याकडे निधी नाही, ही लाजिरवाणी बाबत आहे,’ असा टोलाही हाके यांनी लगावला.