scorecardresearch

पुणे: आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेबाबत आक्षेप

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.

पुणे: आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेबाबत आक्षेप
(संग्रहित छायाचित्र) : लोकसत्ता

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गट ब, क आणि ड संवर्गातील पदांसाठी राबवलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेवर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवडयादीतील काही उमेदवारांची निवड आक्षेपार्ह असल्याचे नमूद करत संबंधित उमेदवारांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना या बाबतचे निवेदन देण्यात आले. पोलीस भरतीत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गैरप्रकार करणाऱ्या टोळीतील ५६ उमेदवारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. तलाठी, आरोग्य भरती आदी परीक्षांमध्ये बोगस उमेदवार होते. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या तक्रारीमुळे म्हाडा, टीईटी, आरोग्य भरतीतील घोटाळा उघडकीस आला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भरतीतही बोगस उमेदवार सक्रिय असल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>> पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी

निवड यादीतील काही नावे बोगस उमेदवारांशी मिळतीजुळती असल्याने संशय बळावला आहे. त्यामुळे निवड यादीतील संबंधित उमेदवारांचे परीक्षा देतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून शहानिशा करावी. दोषी उमेदवार आढळल्यास सायबर पोलिसांत तक्रार करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्हणाले, की काही संघटना, उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत आक्षेप असू शकतो. मात्र भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली. निवडयादीतील उमेदवारांची तपासणी कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस करण्यात येईल. गुणवत्तेच्या आधारावरच प्रक्रिया राबवण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 13:51 IST

संबंधित बातम्या