पुणे : खराडी येथील पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमधील डेटा पोलिसांच्या हाती लागला असून, खेवलकर यांची महिलांबरोबरची छायाचित्रे आणि पार्टीनंतरच्या आक्षेपार्ह चित्रफिती आढळून आल्या आहेत. तसेच, पार्टी प्रकरणातील एका आरोपींने खेवलकर यांना सिगारेटचे छायाचित्र पाठवून अमली पदार्थ हवेत का, अशी विचारणा केली असता खेवलकर यांनी त्याला होकारार्थी उत्तर दिल्याने पार्टीत अमली पदार्थ आणले गेल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात केला. खराडी येथील अमली पदार्थ प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पाच आरोपींना गुरुवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी तपास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी न्यायालयात माहिती दिली.
डॉ. प्रांजल खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी ( वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद ( वय ४१, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे ( वय ४२, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली ) आणि श्रीपाद मोहन यादव ( वय २७, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) तसेच ईशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा ( वय २३, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
‘आरोपी दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. सायबर तज्ज्ञांचे अहवाल आणि साक्षीदारांच्या माध्यमातून ही बाब निष्पन्न झाली आहे. डाॅ. खेवलकर यांनी आरोपी प्राची शर्माबरोबर वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये पार्टी केल्या आहेत. पार्टीत अमली पदार्थ तयार करणाऱ्यांचे नावही निष्पन्न झाले आहे,’ असे कुंभार यांनी न्यायालयात सांगितले.
‘या पार्टीमध्ये अमली पदार्थ आणण्यासंदर्भात एक आरोपी आणि खेवलकर यांची समाजमाध्यमातून चर्चा झाली होती. ‘तो माल आणायचा आहे का’असे एका आरोपींना खेवलकर यांना विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर देऊन ‘ठेवून घे’ असे म्हटल्याचा संवाद मिळाला आहे. तसेच आरोपी काही मुलींची छायाचित्रेही पाठविल्याचे सायबर तज्ज्ञांच्या अहवालावरून स्पष्ट झाले,’ असे कुंभार यांनी न्यायालयात सांगितले.
आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
‘डॉ. खेवलकरचा दुसरा मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, घटनास्थळावरून मिळालेले डीव्हीआर तसेच इतर सहा आरोपींचे जप्त मोबाईल व पेन ड्राईव्ह यांचा सायबर तज्ज्ञांकडून सविस्तर अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होणार आहे. त्या अहवालावरून आरोपींकडे चौकशी करायची आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. विजयसिंग ठोंबरे, ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे-पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.