पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून खोडा घालण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणचे काम तूर्त थांबविण्यात आले आहे. खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असून त्याला अचानक आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खेड तालुक्यातून मार्ग बदलला असून सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मार्फत या रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यांत मिळून एकूण ५४ गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरुनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, संरक्षण विभागाकडून खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेण्यात आल्याने सध्या काम थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा : पुण्यात ‘हर हर महादेव’ सिनेमाच्या शो ला मनसेकडून संरक्षण

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरेखनाला आक्षेप घेण्यात आला आहे. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित गावांमधील मोजणी आणि संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले होते. रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला नव्हता आणि आता अचानक आक्षेप घेण्यात आल्याने तूर्त तेथील काम थांबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील खेड तालुक्यातील १२ गावांमधील मार्गाचे नव्याने संरेखन करण्यात आले आहे. हा सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. रेल्वेचे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.’

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी आतापर्यंत २६ पेक्षा जास्त खरेदीखत करण्यात आली आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक खरेदीखत पुणे जिल्ह्यातच झाली आहेत. आतापर्यंत २० हेक्टरपेक्षा जास्त जागा सहमतीने ताब्यात घेण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पुण्यात येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये भांडण; पोलीस हवालदारालाही मारहाण

भूसंपादन सुरू ठेवण्याच्या सूचना

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून रस्ता-लोहमार्ग करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, या प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठीचे भूसंपादन सुरू ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstacle to pune nashik high speed rail project route changes revised plan submitted to railways pune print news tmb 01
First published on: 09-11-2022 at 14:28 IST