लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणाऱ्या वाहनचालकांना मोकाट जनावरांचा अडथळाही सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे उत्सवातही अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावर सोडण्यात आलेल्या जनावरांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जनावरे जप्त करण्यात येणार असून, मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक उपद्रव टाळता येईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शहरात रस्त्यावर जनावरे सोडून देण्यात येत असल्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, नदीपात्राबरोबरच सेनापती बापट रस्ता, लकडी पूल या भागात रस्त्यावर सोडून दिलेली जनावरे फिरताना सातत्याने आढळत आहेत. सार्वजनिक रस्त्यावर, बसथांब्या लगत आणि रस्ता दुभाजकाजवळ जनावरे भटकत असतात. गणेशोत्सवात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी उपनगरांबरोबरच बाहेरच्या शहरांतूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत शहरातील वाहतुकीचा वेग कमी होतो. तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. त्यातच रस्त्यावर सोडण्यात येत असलेल्या जनावरांमुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रस्त्यावर फिरणाऱ्या विविध प्रकारच्या जनावरांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांबाबत तक्रार करण्याचे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मुंढवा उड्डाणपूल नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला?

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार ही कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यानुसार मालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागाकडून त्यासाठी पथके करण्यात आली असून रस्त्यावर फिरणारी जनावरे जप्त करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव संपेपर्यंत जनावरे सोडण्यात येणार नाहीत. तसेच मालकांकडूनही मोठा दंड आकारला जाईल, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनावरे रस्त्यांबरोबरच पदपथांवरही फिरत असल्याने पादचाऱ्यांनाही त्रास होतो. त्यामुळे पादचाऱ्यांनी महापालिका प्रशानासकडे ९६८९९३१९५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे.