पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समांरभात अधिसभा सदस्य, विद्याशाखा सदस्य यासाठी असलेल्या गणवेशात महिला सदस्यांसाठी मोती रंगाच्या साडीचा समावेश करण्याच्या ठरावास अधिसभेत मान्यता देण्यात आली. तसेच संलग्नित महाविद्यालयात कमवा व शिका या योजनेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्याना येत्या शैक्षणिक वर्षापासून साठ रुपये प्रतितास मानधन देण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी ठराव आणि प्रश्‍नोत्तरांवर चर्चा झाली. अधिसभेत सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी, असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. तसेच विद्यापीठ उपकेंद्रावर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाची विद्या शाखा सुरू करण्याचा ठरावही मान्य करण्यात आला. पदवीप्रदान समांरभात अधिसभा सदस्य, विद्याशाखा सदस्यांसाठी असलेल्या गणवेशात महिला सदस्यांसाठी मोती रंगाच्या साडीचा समावेश करण्याबाबत, अधिसभा सदस्यांना बॅज देण्याचा डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी मांडलेला ठराव पारित झाला.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तीन वर्षाचाही पदवी अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. या बाबत पालक, विद्यार्थी, शिक्षकांमध्येच स्पष्टता नाही. तसेच चार वर्षाच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेता विद्यापीठाने त्याबाबत पुढाकार घेण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर विद्यापीठातर्फे महिन्याभरात कार्यशाळा घेऊन सर्व शकांचे निरसन केले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्तीसाठी एक कोटी निधीची तरतूद

नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणारे विद्यार्थी, पालकांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रस्ताव डॉ. अपूर्व हिरे आणि अशोक सावंत यांनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रसेनजीत फडणवीस यांनी अनुमोदन दिले. या शिष्यवृत्तीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही अधिसभा अध्यक्षांनी जाहीर केले.