लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असतानाच पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. हडपसर, वडगाव शेरी तसेच खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यासह सहकारी बँकांचे संचालक असलेल्यांचा समावेश आहे. या प्रवेशांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची ताकद काही प्रमाणात वाढली आहे.

हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची गुरुवारी संध्याकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. त्यातच गुरुवारी सकाळी हडपसर वडगाव शेरी तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुती सहभागी असलेल्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करत विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचे योगदान राहील, अशी ग्वाही दिली आहे.

आणखी वाचा-हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !

हडपसरमधील दिलीप तुपे, अनिल तुपे तर खडकवासला येथील भाजपचे समीर धनकवडे यांच्यासह वडगाव शेरी भागातील माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकात टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी पवार यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ‘ तुतारी ‘ हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आज हडपसर खडकवासला विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. आज सकाळीच भाजपच्या या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत त्यांना पाठिंबा दिला. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे, हडपसर मतदारसंघातील संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यासह धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

आणखी वाचा-दमडीही खर्च न करता जिंकणारे लोकप्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी च्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचे सर्वांचे मोलाचं योगदान राहिल, असा शब्द या सर्वांनी या प्रवेशादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिला. याबरोबरच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशामुळे पुण्यात भाजपला आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Story img Loader