इंदापूर : तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. रविवारी दिवसभरात सव्वा लाखांहून अधिक भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करत दर्शन घेतले. रविवारची सुटी व आषाढी एकादशीचा संयोग आल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिश्चंद्र माने व मोहन काळे यांनी सांगितले.
मंदिरात सकाळी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा आणि अभिषेकानंतर दर्शनाची सुरुवात झाली. यानंतर कळस येथून निघालेली मानाची पालखी आणि दिंडी दुपारी मंदिरात दाखल झाली. त्यावेळी पळसदेव, रुई, भादलवाडी, डाळज परिसरातील गावांमधून आलेल्या दिंड्या आणि भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. डोक्यावर आभाळाची सावली, गारवा वाहणारा वारा, मुखात हरिनामाचा घोष अशा भक्तिमय वातावरणात हजारो पावले मंदिराच्या दिशेने निघाली होती.
वालचंदनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दर्शनासाठी नियोजनबद्ध रांगा, स्वयंसेवकांची फळी, तसेच वाहतूक व्यवस्थापन यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. मंदिर परिसरात फराळ, खेळणी आणि विविध वस्तूंच्या स्टॉल्समुळे यात्रा रंगतदार झाली. भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी विठ्ठलदर्शनासाठी हजेरी लावली.