पुणे : वाघोली परिसरात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २२ लाख २४ हजार रुपयांची एक किलो ११२ ग्रॅम अफू आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला.

तुलसीदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. वरणी, ता. वल्लभनगर, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक वाघोली भागात गस्त घालत होते. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एका सोसायटी समोरील मोकळ्या जागेत एक जण काळ्या रंगाची पिशवी घेऊन थांबल्याची माहिती तपास पथकला मिळाली.

पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच वैष्णव तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत एक किलो ११२ ग्रॅम अफू सापडली. वैष्णवने अफू कोठून आणली, तसेच तो कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस कर्मचारी सचिन माळवे, विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, संदिप शिर्के यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.