पदपथावर झोपण्याच्या वादातून एकाने अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना नाना पेठेतील पदमजी चौकात घडली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एकास अटक केली.

मोहित अमीर अंगीर (वय ३०, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रिजवान शेख (वय ४१, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख नाना पेठेतील रहिवासी आहे. नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. अंगीरने अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड मारला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनाेळखी व्यक्तीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.