पुणे : मोटारीला दुचाकीने धडक दिल्याने विचारणा करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, एकाला अटक करण्यात आली.

मृणाल दीपक जाधव (वय १९, रा. राज टाॅवर, भाजी मंडई, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी दोन अल्पवयींनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंबेगाव, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत बांदल याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदल, त्याचा भाऊ आणि मित्र मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर एका काॅफी शाॅपसमोर रविवारी (२ नोव्हेंबर) गप्पा मारत थांबले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी जाधव आणि त्याच्याबरोबर असलेले दोन अल्पवयीन दुचाकीवरुन तेथे आले. बांदल याने काॅफी शाॅपसमोर मोटार लावली होती.

दुचाकीने मोटारीला धडक दिली. त्यामुळे बांदल याने आराेपी जाधव आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना विचारणा केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी जाधव आणि साथीदारांनी बांदल याच्यावर कोयत्याने वार केले. त्याचा भाऊ आणि मित्रांना शिवीगाळ केली. काॅफी शाॅपसमोर कोयता उगारून दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

शहरात रस्त्यावर होणाऱ्या वादातून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ वादातून वाहनचालकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात मोटार चालक तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. बाणेर भागात किरकोळ वादातून एका मोटारचालकाने दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केल्याची घटना घडली होती. हडपसर भागात मोटार चालक व्यावसायिक तरुणाचा किरकोल वादातून टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती.