लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरात नाकाबंदी करण्यात आली असताना वारजे भागात कोबिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेचे पथक आणि ८ ते १० दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोयता फेकून मारल्याने त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला. पळून जाणार्‍या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोर होते. ही घटना वारजे येथील रोजरी स्कुलजवळील म्हाडा वसाहतीमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली.
या घटनेत पोलीस कर्मचारी कट्टे हे जखमी झाले आहेत.

शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदी केली होती. या वेळी गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, पोलीस निरीक्षक बहिरट, पोलीस उपनिरीक पवार आणि त्यांचे सहकार्‍यांनी वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिग ऑपरेशन सुरू होते. गुन्हेगारांची तपासणी करीत असताना त्यांना रोझरी स्कुलजवळ ८ ते १० जणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला. तो पोलीस कर्मचारी कट्टे यांना लावून ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना पकडले. इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

हेही वाचा… ४४ लाख मतदार ठरविणार पुणे, पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पकडलेल्या ५ जणांकडून एक गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, हातोडा असा माल जप्त केला आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीने दरोडेखोर आले होते. दरोडेखोर सराइत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.