पुणे : शहरातील चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक, फ्लेक्स उभे असताना महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिली! हे केवळ ‘अविश्वसनीय’ असल्याची टिप्पणी करून महापालिका आयुक्तांनी विशेष पथकाद्वारे शहरातील होर्डिंगची तपासणी करण्याचा आदेश दिला. तसेच, यामध्ये चुकीची माहिती आढळल्यास संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक करवाई करण्याचा इशाराही दिला.
महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यांवर किंवा भागांत जाहिरात फलक, फ्लेक्स उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेचे शुल्क भरून जाहिरात फलक उभारण्यासाठी मान्यता दिली जाते. यामधून महापालिकेला उत्पन्न मिळते. मात्र, शहरातील अनेक चौकांमध्ये, तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे जाहिरात फलक उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेतला. त्या वेळी आकाशचिन्ह व परवाना विभागाने महापालिका हद्दीत केवळ २४ अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती दिली. ही माहिती अविश्वसनीय व आश्चर्यकारक असल्याचे स्पष्ट करून विशेष पथक नेमून शहरातील जाहिरात फलकांची तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अनधिकृत आढळलेल्या जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करून संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
अनेकांनी नियमावली डावलून जाहिरात फलक उभारल्याचे दिसते. बेकायदा उभारलेल्या जाहिरात फलकांचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविला आहे. या फलकांवर कारवाई करून त्याचा अहवाल न दिल्यास संबंधित सहायक आयुक्तावर कारवाई केली जाणार आहे. – नवल किशोर राम, महापालिका आयुक्त