पुणे : ‘दहशतवाद्यांनी आमचे कुंकू पुसले, त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून केंद्र सरकारने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देऊन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याबाबत केंद्र सरकारचे आभारी आहोत,’ अशा शब्दांत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या.

काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यात पुण्यातील पर्यटक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि कन्या आसावरी, तसेच कौस्तुभ गनबोटे यांची पत्नी संगीता यांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘हवाई दलाने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिले, ते योग्य आहे. त्यासाठी आम्ही सरकारचे आभारी आहोत. दहशतवाद्यांनी आमच्यासमोरच आमचे कुंकू पुसले. गोळ्या घालून पतीला मारले. दहशतवाद्यांना धडा शिकविणे आवश्यकच होते. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील त्यांच्या मुलींना समजून घेतील, याची खात्री होती,’ अशा शब्दांत प्रगती जगदाळे यांनी भावना व्यक्त केल्या. ‘या मोहिमेमुळे खऱ्या अर्थाने सरकारने माझ्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे’ असे आसावरी जगदाळे म्हणाल्या.

कौस्तुभ गनबोटे यांची पत्नी संगीता यांनीही मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. ‘हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी आम्ही काय केले आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगा, असे महिलांना म्हटले होते. त्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदी यांनी योग्य प्रत्युत्तर दिले आहे, असे त्या म्हणाल्या.

दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत हल्ले सुरू ठेवा : लेले

डोंबिवली : ‘पहलगाम हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष लष्करी मोहिमेतून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री घेतला. याबद्दल आम्हा कुटुंबीयांना खूप समाधान आणि आनंद वाटला. हा एक हल्ला झाला. दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंबातील हर्षद संजय लेले यांनी दिली. जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेली लष्करी कारवाई खूप महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.