पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये धमाक्यांचा आवाज… सर्वत्र धुरांचे लोळ… आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे फोन… भोंग्यांचा आवाज… कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण… सर्वत्र धावाधाव… काहीतरी संकट आले म्हणून म्हणून सुरक्षा यंत्रणेची चक्रे तत्काळ फिरली… आणि अग्निशामक विभागाचे पथक पाच मिनिटांत पोहोचले… कर्मचारी, नागरिकांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आले. १५ मिनिटांत स्वसंरक्षण सराव (मॉक ड्रिल) यशस्वी पार पडले.

युद्धजन्य परिस्थितीमध्ये शहरातील संकट व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवणे, नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य इमारतीमध्ये बुधवारी मॉक ड्रिल घेण्यात आले. चार वाजता भोंगा वाजला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धूर पसरला असून, काही लोक जखमी झाले आहेत. काही जण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधून सर्वांना बाहेर काढले. सर्व जण बाहेर आल्यानंतर जवानांनी प्रत्येक दालनात जाऊन कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर इमारतीमधून चार नागरिकांना ‘ब्रांटो स्काय लिफ्ट’च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. दोघांना रोप लावून रेस्क्यू केले. तर, चौघांना स्ट्रेचरवरून रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने रवाना केले.

या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाच्या चार बंबांसह २० अधिकारी, कर्मचारी, चार रुग्णवाहिका, १६ कर्मचारी, सुरक्षा विभागाचे ५२ कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी असे ३७ जण तसेच वाहतूक पोलिसांचे २४ जण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एक अधिकारी, एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेचे ४६ स्वयंसेवक, १८ आपदा मित्र सहभागी झाले होते.

धूर बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रणा

काही महिन्यांपूर्वी महापालिका इमारतीमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले होते. त्यावेळी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तो धूर लवकर बाहेर पडला नव्हता. अशाच प्रकारे रासायनिक हल्ला झाल्यास त्या धुरामध्ये अडकून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन धूर तत्काळ बाहेर काढण्यासाठी ‘स्मोक एग्झॉस्ट यंत्रणा’ बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सक्रिय करून सर्व धूर काही क्षणात बाहेर काढण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकट अचानक येते. त्यामुळे मॉक ड्रिलच्या माध्यमातून यंत्रणांचे प्रशिक्षण आणि सज्जता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा अधिकाधिक मॉक ड्रिल उपक्रमांचे आयोजन केले जाईल. १५ मिनिटांत मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडले. तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका