पुणे : कोंढवा येथील कत्तलखान्यातील सांडपाण्याचे नमुने संमतीपत्रामध्ये घालून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त असल्याने हा कत्तलखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.
कोंढवा येथील कत्तलखान्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे कत्तलखाना बंद करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजाविली आहे का, तसेच कत्तलखान्यामध्ये दररोज १५० जनावरांची कत्तल होत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून, कत्तलखान्यातील पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमध्ये येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे का, अशी विचारणा भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी कत्तलखाना बंद करण्यात आल्याचे जाहीर केले.
‘कोंढवा कत्तलखाना परिसरातील घरगुती वसाहतींच्या पाणी प्रदूषण आणि दुर्गंधीसंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २८ फेब्रुवारी २०२५ मध्ये कत्तलखान्याची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान सांडपाण्याचे नमुने कत्तलखान्याला संमतीपत्रामध्ये घालून दिलेल्या मानकांच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत त्या संदर्भात कत्तलखान्याला आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वैयक्तिक सुनावणी घेऊन ८ मे रोजी कत्तलखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे फडणवीस यांनी सांगितले.