पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील मुंढवा परिसरातील शासनाच्या ४० एकर जमीन विक्रीचा व्यवहार दोन दिवसांपूर्वी समोर आला. या जमीन खरेदी व्यवहारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव समोर येताच, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत, अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली.

या सर्व घडामोडींदरम्यान, जागेच्या व्यवहार प्रकरणी दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले, तर जमीन खरेदी करणाऱ्या तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पार्थ पवार यांना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याने विरोधी पक्षातील नेते अधिक आक्रमक झाले. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत मुंढवा येथील जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

अजित पवारांची जिल्हास्तरीय बैठक सुरू असताना आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले होते. पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय त्यांची बैठक सुरू होती. याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर मास मूव्हमेंट संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करावा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलकांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.