जाती-धर्माविरोधात वक्तव्य न करण्याची पक्षातील सहकाऱ्यांना समज; शरद पवार यांची ब्राह्मण संघटनांबरोबर बैठक

पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानांमुळे ब्राह्मण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे कोणत्याही जाती-धर्माबद्दल विधान करू नये, अशी समज पक्षातील सहकाऱ्यांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पुणे : पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानांमुळे ब्राह्मण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे कोणत्याही जाती-धर्माबद्दल विधान करू नये, अशी समज पक्षातील सहकाऱ्यांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. आरक्षणाबाबत सरकार वेळोवेळी आपली भूमिका मांडत आहे, त्यामुळे कोणीही आरक्षणविरोधी नाही. प्रगतीमध्ये मागे राहिलेल्या मागास आणि वंचित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भावना आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची बैठक निसर्ग मंगल कार्यालय येथे झाली. त्यानंतर पवार यांनी या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, दवे नावाच्या व्यक्तीनं माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. इतरही संघटनांना मला भेटायचे होते. त्यानुसार मी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना भेट निश्चित करण्यास सांगितले. एकूण ४० जण या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले. त्यांच्यात एक अस्वस्थता होती. ती अस्वस्थता माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत होती. ही विधाने केल्यानंतर पक्षात आमची चर्चा झाली. त्यात कुठल्याही जाती-धर्माविरोधात वक्तव्य करू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे.  केंद्र आणि राज्याची माहिती संकलित केल्यानंतर नोकऱ्यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसणार नाही असे मी सांगितले. त्यावर काहींनी कोणालाही आरक्षण नको असे म्हटले. मात्र, मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असे सांगितले. तसेच आरक्षणाला विरोध करू नये, असे शिष्टमंडळाला सांगितल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

विविध समाजांना मदत करण्यासाठी असलेल्या महामंडळाच्या धर्तीवर ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसंदर्भात ‘हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील असून मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांची  भेट घडवून आणू,’ असे आश्वासन दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.

महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न राज्यकर्ते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे या मूलभूत प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ज्ञानवापी मशीद यासारखा मुद्दा केंद्रातील राज्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Party statements against caste religion sharad pawar meeting brahmin organizations ysh

Next Story
३० मेपासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी