पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था, तसेच वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि त्यामुळे सातत्याने घडणारे अपघात हे चित्र कायम आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही आयटी पार्कमधील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शासकीय यंत्रणांकडून केवळ मलमपट्टीचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
आयटी पार्कमध्ये यंदा पावसाळ्यात रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमावर पसरल्या होत्या. यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्याोगाचा चेहरा असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील विदारक परिस्थिती उघड झाली होती. यावरून विरोधकांसह आयटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आवाज उठवल्याने अखेर सरकारने पावले उचलली. सरकारकडून आयटी पार्कमधील अनेक प्रकल्पांबाबत बैठका घेतल्या गेल्या. हे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेतली. याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळा आयटी पार्कचे दौरे करून यंत्रणांची झाडाझडती घेतली.
आयटी पार्कमधील नागरी सुविधांच्या दुरवस्थेला तोंड फुटल्यानंतर दोन महिन्यांनीही येथील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आयटी पार्कमधील खड्डेमय रस्ते कायम असून, त्यामुळे होणाऱ्या कोंडीतून आयटी कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागत आहे. याच वेळी आयटी पार्क परिसरात अनेक मोठी बांधकामे सुरू असल्याने अवजड वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांचे निर्बंध असतानाही त्यांचे उल्लंघन करून राजरोस फिरणाऱ्या सिमेंट मिक्सरने नुकताच एक बळी घेतला. या प्रकरणी स्थानिक रहिवाशांसह आयटी कर्मचारी रस्त्यांवर उतरल्यानंतर प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचे पाऊल उचलले.
विविध शासकीय यंत्रणांची एकमेकांवर ढकलाढकली सुरू आहे. कामाचा वेग कमी असून, दीर्घकालीन उपाययोजना होताना दिसत नाहीत. संपूर्ण रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी केवळ खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात येत आहे. – पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज
