पिंपरी पालिकेची संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात यंत्रणा सज्ज

महापालिकेच्या भोसरी, आकुर्डी आणि थेरगाव विभागीय रुग्णालयांत सध्या करोना रुग्णांवर उपचार करण्यात येतात.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पालिकेने जिजामाता रुग्णालयात (नवीन) लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. लहान मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन रुग्णालयाची रचना करण्यात आली आहे.

पिंपरी : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी पालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पालिका रुग्णालये, करोना काळजी केंद्रांसह आवश्यक अतिदक्षता कक्ष, औषधांचा साठा, प्राणवायूची उपलब्धता आदींची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यासाठी होणाऱ्या खर्चाची व्यवस्था करोना निधीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे केलेली आहे.

राज्य शासनाचे निर्देश आणि तज्ज्ञांच्या सूचनेनुसार महापालिकेने संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात आवश्यक तयारी केली आहे. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी याबाबतची माहिती दिली. शहरातील मध्यवर्ती यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा (वायसीएम) चौथा मजला पूर्णपणे राखीव ठेवण्यात आला असून या ठिकाणी २०० ते ८०० रुग्णांची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येकी १५ खाटांची क्षमता असलेले दोन अतिदक्षता कक्ष असतील. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात १०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्वतंत्रपणे दहा अतिदक्षता विभाग कार्यरत असतील. चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या चार इमारती राखीव ठेवल्या आहेत. तेथे प्रत्येकी २०० याप्रमाणे ८०० खाटांची व्यवस्था केलेली आहे. याव्यतिरिक्त, आवश्यकतेनुसार करोना काळजी केंद्र तयार ठेवलेले आहेत. वेळप्रसंगी तेथील खाटांची संख्या वाढवता येईल, असे नियोजन आहे.

महापालिकेच्या भोसरी, आकुर्डी आणि थेरगाव विभागीय रुग्णालयांत सध्या करोना रुग्णांवर उपचार करण्यात येतात. नेहरूनगर येथील करोना काळजी केंद्रात २०० खाटांची सोय आहे. तेथे ८०० खाटांपर्यंत विस्तार करता येऊ शकतो. त्याचपध्दतीने, चिंचवडचे ऑटो क्लस्टर काळजी केंद्रही उपलब्ध असणार आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पिंपरी पालिकेने केल्या आहेत. रुग्णालये तसेच करोना काळजी केंद्रात खाटांची व्यवस्था, सर्व प्रकारची  औषधे, वैद्यकीय उपकरणे, प्राणवायूंचा साठा आदींची तयारी करून ठेवलेली आहे. तिसरी लाट येईल तेव्हा येईल. मात्र, नागरिकांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pcmc administration system ready for the possible third wave zws

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या