पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन करूनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित न केल्याने १६ साेसायट्यांचे नळजोड महापालिकेने खंडित केले आहेत. दरम्यान पालखी सोहळा, पोलीस बंदोबस्ताअभावी बंद झालेली कारवाई सोमवारपासून पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे पर्यावरण विभागाने सांगितले.
शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना ६२० ते ६३० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येला हे पाणी पुरत नाही. मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. लोकसंख्या वाढली. मात्र, पाण्याची उपलब्धतता वाढली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होते. विस्कळीत, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते. शहरातील अनेक मोठ्या साेसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.
एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) २० हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसाट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्रचक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात ४५६ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी २६४ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत.
तर, ‘एसटीपी’ सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही १८४ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंदच आहेत. त्यामुळे महापालिकेने एक जूनपासून पहिल्या टप्प्यात ५० सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय महापालिकेने केला आहे. त्यापैकी १६ साेसाट्यांचे नळजाेड खंडित केल्याची माहिती कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी दिली.
एसटीपी बंद असलेल्या पन्नास सोसायट्यांचे नळजोड खंडित केले जाणार आहेत. त्यापैकी सोळा साेसायट्यांचे पाणी खंडित केले आहे. सोमवारपासून पुन्हा कारवाई सुरू केली जाणार आहे. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.